मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातील इयत्ता पाचवीचे 16 हजार 579, आठवीचे 14 हजार 815 असे एकूण 31 हजार 394 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.


शिष्यवृत्ती परीक्षेत पाचव्या इयत्तेतील सोलापूरचा सार्थक तळे आणि कोल्हापूरच्या अनुष्का ननावरे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. दोघांनी शिष्यवृत्ती परीक्षेत 99.32 टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साताऱ्याच्या राधिका इंगळे हिने 95.13 टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

यंदाच्या वर्षी पाचवीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण 22.4 टक्के आणि आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण 18.49 टक्के आहे. पाचवीच्या परीक्षेतील उत्तीर्णाचे प्रमाण 0.93 टक्क्यांनी घटलं आहे, तर आठवीतील उत्तीर्णांचं प्रमाण 5.92 टक्क्यांनी वाढलं आहे.