मुंबई : तेल आपल्या रोजच्या जेवणातलं महत्त्वाच पदार्थ आहे. मात्र तुम्ही वापरत असलेलं तेल हे शुध्द आहे का? आपण आपल्या कुटुंबाला तेलातून विष तर देत नाही ना? वापरत असलेल्या तेलात पामतेल तर मिसळले नाही ना? हे सर्व प्रश्न मनात येण्याचं कारण बातमीच तशीच आहे.


महाराष्ट्रातील विविध भागातून 4.50 कोटींच बनावट तेल जप्त केलं आहे. अन्न आणि औषध पुरवठा विभागाने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 30 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि 96 पेक्षा अधिक भेसळ युक्त तेलाचे नमुने मुंबई अन्न आणि औषध पुरवठा विभागाने जप्त केले आहेत.


या धाडस्त्रात आठ उत्पादकांवर केलेल्या कारवाईत चार कोटी ९८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. शेंगदाणा, मोहरी, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, पामोलिन आदी तेलांचे सुमारे 93 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापैकी 49 नमुने भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहेत. ब्रॅण्डेड  कंपनीच्या उत्पादनांचीही पुढील टप्प्यात तपासणी करण्यात येणार आहे. तर हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते कोणते तेल वापरतात ते तपासले जाणार आहे. ही मोहीम आधी फक्त मुंबई शहरात राबवली होती. मात्र याचे स्वरूप वाढवून संपूर्ण राज्यात करण्यात आली आहे.


VIDEO | अन्न व औषध पुरवठा विभागाकडून साडे चार कोटींचं भेसळयुक्त तेल जप्त



अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात त्यातील सुमारे 50 टक्के तेल हे योग्य नसून ते भेसळयुक्त असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत उघड झालं आहे. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सुट्या तेलाचे नमुने गोळा करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीत रंग मिसळलेला किंवा दुसरे तेल मिक्स केल्याचे उघड झाले आहे. नामवंत कंपन्यांच्या तुलनेत हे तेल खूपच स्वस्त असल्यामुळे या भेसळयुक्त तेलाला झोपडपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र हे तेल आरोग्याला अपायकारक असते. या खाद्यतेलात रंग मिसळलेला असतो. या वर प्रशासनाने 30 अन्न निरीक्षकांची विविध पथके स्थापन करून या उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे.