मुंबई : दिवाळीच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या भेसळीवर अन्न आणि औषध प्रशासन प्रशासनानं चाप बसवला आहे. मुंबईच्या विविध भागात छापा टाकून 2 कोटींचा मावाही जप्त करण्यात आला आहे.
गेल्या 15 दिवसात एफडीए अर्थातच अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. प्रशासनानं माव्याची मिठाई आणि खाद्य तेलातील भेसळीवर कडक लक्ष ठेवलं आहे. एफडीएने मुंबईत सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली 5 पथकं तैनात करण्यात आली आहेत, तर ठाण्यात 7 पथकांकडून कारवाई केली जात आहे. राज्यातील पुणे, नाशिक औरंगाबाद आणि नागपूरमध्येही प्रशासनानं कारवाई केली आहे.
आतापर्यंत जवळपास 18 टन भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. तर 12 टनांची मिठाईही सील केली आहे. 10 टन खाद्यतेलही ताब्यात घेतलं आहे. एफडीएकडून ग्राहकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासनाने मिठाईवर लावल्या जाणाऱ्या चांदीच्या वर्खावरही चिंता व्यक्त केली आहे. बनावट अल्यूमिनियम वर्ख लावलेल्या मिठायांची विक्री करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहनही केलं आहे.