भिवंडी : भिवंडी शहरातील एका व्यक्तीनं पत्नी सोडून गेली म्हणून आपल्या 3 मुलांना घरात कोंडून ठेवल्याची बाब समोर आली आहे. आपली सोडून गेलेली बायको मुलांना कधीही घेऊन जाईल या भीतीनं या व्यक्तीनं मुलांची शाळा बंद करुन त्यांना अज्ञातवासात टाकलं. भिवंडीच्या कोटरगेट मस्जिद परिसरातील लंबी चाळमध्ये राहणाऱ्या शफिक मोमीननं 2010 साली पत्नी सोडून गेल्यानंतर तब्बल 6 वर्ष मुलांना कोंडलं होतं.
भिवंडी शहरातील कोटरगेट येथील लंबी चाळ लगतच्या एका खुराड्यासारख्या घरात तीन मुलांना मागील सहा वर्षां पासून घरातच बसून ठेवले होतं. त्यांना घराबाहेर जाण्यास, इतरांशी संपर्क साधण्यास, शाळेत जाण्यास बाप मनाई करीत असल्याची कुणकुण मागील महिन्याभरापासून लागल्याने परिसरातील नागरिकांना लागली होती. त्यानंतर माजी नगरसेविका रुक्सना कुरेशी यांनी पुढाकार घेऊन काल रात्री 12 च्या सुमारास रेय्यान (15 वर्ष), अय्यन (13), मोहम्मद (10) या तिन्ही मुलांची सुटका केली. या तीनही मुलांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान ही तीनही मुलं घाबरलेल्या अवस्थेत असून त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याचं समोर आलंय. त्यांच्यावर उपचार करीत असताना मोठा मुलगा रेय्यान व छोटा मुलगा मोहम्मद हे चालताना लंगडत असल्याने त्यांच्या पायांचे एक्सरे काढण्यात आले. यावेळी रेय्यानचा उजवा पाय मारहाणीमुळे फॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्या पायावर प्लॅस्टर करण्यात आले आहे, तर लहान मुलाच्या पायाला मुकामार लागला आहे.
दररोज त्यांचा बाप मुलांना खाणावळीतून डब्यामध्ये जेवण घेऊन येत होता. मात्र ज्या घरात मुलांना ठेवण्यात आलं होतं, ते घर अंधारं, धुळीनं भरलेलं होतं. त्यामुळे मुलांची भीतीनं शारीरिक आणि मानसिक स्थीती बिघडली आहे. तसंच मुलं बापाविरोधात जबाब देण्यासही तयार नसल्याचं समोर आलंय. स्थानिक नगरसेविकेनं याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.