सांगली : शेतकऱ्यांच्या मागे असणारी सातबाराची कटकट आता मिटणार अशी चिन्ह आहेत. शेतकऱ्यांची सातबाराविना लवकर न होणारी कामं आणि सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी पळापळ यातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा आता ऑनलाईन उपलब्ध करुन दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे, ते कार्यालयच संबंधित शेतकऱ्याचा सातबारा हा ऑनलाईन उपलब्ध करुन घेईल. यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. याबाबतचे शासकीय परिपत्रक लवकरच निघणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगलीतील कडेगावमध्ये बोलताना ही माहिती दिली.


राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा आणि खाते उतारा ऑनलाईनचं काम मागील काही काळापासून सुरु होतं. सध्या हे काम जवळपास पूर्ण व्हायला आलं आहे. याबाबतचं परिपत्रक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबंधित शेतकऱ्याचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करुन घेईल. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्या शेतकऱ्याचा सातबारा उतारा 'डाऊनलोड' करुन घेता येईल.

शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. यामुळे सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा वाया जाणारा वेळ आणि सातबारा नसल्याने शेतकऱ्यांची अडणारी कामं या दोन्ही गोष्टींवर या ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन दिल्याने तोडगा निघणार आहे.


काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. हे काम मागील काही काळापासून चालू होतं. आता राज्यातील शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाईन करण्याचे सर्व काम पूर्ण होत आहे. लवकरच याची कार्यवाही देखील होणार आहे. शेतकरी वर्गाने देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र ऑनलाईन सातबाराची प्रक्रिया करताना ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या चुका देखील दुरुस्त करुन घ्याव्यात, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.