मुंबई : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 56 लाख 59  हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा बँकांकडील सुमारे 36 लाख कर्ज खात्यांची आणि व्यापारी बँकांकडील 30 लाख कर्ज खात्यांची माहिती ऑनलाईन माहिती (डेटा) माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर करण्याचे काम प्रगती पथावर असून दिवाळीपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरूवात करावी अशा सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत  संबंधितांना देण्यात आल्या.

अमंलबजावणीचा भाग म्हणून ज्या गावांमध्ये ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, अशा गावांमध्ये चावडी वाचनाद्वारे आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील निकषानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी ‘आपलं सरकार’पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पात्र लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर बॅंकांमार्फत  शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील रक्कमा निरंक करून योजनेचा लाभ देण्यात येईल.