मुंबई: कर्जमाफीसाठी शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी आज बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. जागरण गोंधळ आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

संपूर्ण कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न

कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशी तीव्र झालं आहे.

सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. या वेळी 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कोल्हापूर, नाशिकमध्येही टाळं

तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील रायपूरमध्ये आंदोलकांनी तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं.

कोल्हापुरातल्या शिये गावात रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनं तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजीपाल्याची आवक घटली

शेतकरी संपाचा परिणाम शहरांमध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे.

आज अहमदनगर जिल्ह्यात केवळ 1 टक्केच भाज्यांची आवक झाली आहे तर दूधाचं संकलन झालंच नाही आहे. यामुळे नगरमध्ये आज लोकांची मोठी गैरसोय होणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या घरासमोरच भाजीपाला फेकला

अमरावती आणि पुणतांब्यात शेतकऱ्यांचा रोष आजही पाहायला मिळाला

कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्तांच्या घरासमोरच भाजीपाला फेकून दिला. यामध्ये पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.



तर तिकडे पुणतांब्यात सरकारचा दहाव्याचा विधी करून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ ठप्प

शेतकरी संपामुळे ग्रामीण अर्थकारण मोठ्या प्रमाणावर संकटात सापडल्याची प्रतिक्रिया नाशिक कांदा बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकरांनी दिली आहे.

शेतकरी संपात ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. 100 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल थांबली आहे.  शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजंदारी बुडाली आहे.



17 मोठ्या बाजारसमिती आणि 20 उपबाजार समितीत रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला आहे.

त्यामुळे भविष्यात निर्यातीवर आणि भावांवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.