मुंबई : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मोबाईलची चोरी झाली आहे. धक्कादायक म्हणजे झेड प्लस सुरक्षेचं कवच भेदून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दादर-पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड-प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र, इतकी कडक सुरक्षा असूनही त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
उज्ज्व निकम हे मुंबईहून जळगावला ट्रेनने प्रवास करत होते. दादर-अमृतसर-पठाणकोट एक्स्प्रेसने रात्री प्रवास करताना त्यांनी आपल्या उशाला दोन फोन ठेवले होते. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर जेव्हा त्यांनी फोन तपासून पाहिलं, तेव्हा फोन गायब असल्याचं समजलं.
जळगावला उतरल्यावर उज्ज्वल निकम आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी रेल्वे पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.
मुंबई हल्ल्याचा खटला लढण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजेच 2009 पासून उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हा ते ट्रेनने प्रवास करत असतात त्यावेळी त्यांच्यासोबत AK-47 सोबत असणारे वैयक्तिक सुरक्षारक्षक आणि रेल्वे प्रशासनाकडून एन्ट्री-एक्झिटच्या ठिकाणी प्रत्येकी एक कॉन्स्टेबलही सुरक्षेसाठी सोबत असतात.