मुंबई: शेतकऱ्यांच्या संपाला यश येण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्य सरकार अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने महाराष्ट्र तापलेला असताना दुसरीकडे अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अभ्यास करत असल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा दुष्काळामुळे नुकसान होऊन कर्ज थकले आहे, त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन, त्यांना नव्याने कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याद्वारे महाराष्ट्र राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 31 लाख शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

अर्थात ही योजना तातडीने अंमलात येणार नसून, त्यासाठी राज्य सरकारमधली तज्ज्ञ मंडळी यावर अभ्यास करत असून, या योजनेला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.

1 लाख कर्जमाफी नको, संपूर्ण कर्जमाफी द्या

1 लाखापर्यंतची कर्जमाफी मान्य नाही तर संपूर्ण कर्जमाफी द्या. सात-बारा कोरा करण्याचं जे आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण  करा, अशी मागणी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

तर अल्पकर्जधारक वगेैरे असं काही नसतं. हे सरकारचं शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

संपूर्ण कर्जमाफी हवी,अल्पधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हे सरकारचं फूट पाडण्याचं धोरण आहे. मोठा शेतकरी, छोटा शेतकरी अशी तुलना नको, शेतकरी हा शेतकरी असतो. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

"शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय दिलासा मिळणार नाही"


- काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात 


"राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील"


: आमदार पाशा पटेल


सरसकट कर्जमाफी अशक्य

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरसकट कर्जमाफी कुठल्याही सरकारला शक्य नसल्याचं म्हटलं होतं.

"यूपीएच्या काळात कर्जमाफी झाली त्यावेळी महाराष्ट्रात सात हजार कोटी रुपयांची आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती.  सरसकट कर्जमाफीची भावना तयार केल्याने नियमिय कर्ज भरणाऱ्या शेतकरी परावृत्त होतील, त्यामुळे बँका अडचणीत येतील. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल असा निर्णय घेऊ", असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

"आम्ही शेतकरी कर्जमाफीला नाही म्हटलेलं नाही. राज्य सरकार 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना बनवत आहे", असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.



शेतकरी संपामुळे शहरं गॅसवर

शेतकऱ्यांच्या संपामुळं सध्या शहरं गॅसवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली असताना आज शेतकरी आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कारण सध्या पुणतांब्यात किसान क्रांती कमिटीच्या सदस्यांची बैठक सुरु झाली आहे.

मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर आज चर्चेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान शेतकरी हे शांततेच आंदोलन करत आहेत, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी बाहेरचे लोक आंदोलनाला हिंसक वळण देत असल्याची प्रतिक्रिया किसान क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचा संप आता आखणीनंच तीव्र होताना दिसत आहे. नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

नाशिकच्या सिद्ध पिंपरीमध्ये आज सकाळी शेतकऱ्यांनी शहराला दूध पुरवठा करणारा टँकर रस्त्यावर रिकामा केला. यावेळी लाखो लिटर दूध शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतलं. तर त्यानंतर काहीच वेळात धान्याचा पुरवठा करणारा एक ट्रक शेतकऱ्यांनी आडवला.

त्या ट्रकच्या चाकातली हवा काढली आणि त्यातल्या गव्हाच्या गोण्या रस्त्यावर फोडून तो फेकून दिला. यानंतर गाड्या अडवून धान्य आणि दूधाची नासाडी करणाऱ्या या शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज केला. त्यातल्या 20 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.