मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. संपाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे.
1 जूनला सुरु झालेला शेतकऱ्यांचा संपाला आता वेगळंच वळण घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकरी संपावर ठाम आहेत. दरम्यान ज्या गावातून शेतकऱ्यांच्या संपाचा श्रीगणेशा झाला, जे गाव शेतकऱ्यांच्या संपाचं केंद्रस्थान होतं, त्या पुणतांब्याऐवजी आता नाशिक शेतकऱ्यांच्या संपाचं केंद्रस्थान होण्याची शक्यता आहे. कारण नाशिकमध्ये काल शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या सभेमध्ये पुढचे 4 दिवस संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर, आंदोलनाचं नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी इतर शेतकरी नेते आता पुढे सरसावले आहेत. नाशिकमधील बैठकीत बुधाजीराव मुळीक, अजित नवले, रामचंद्रबापू पाटील आणि रघुनाथ दादा पाटील इत्यादी नेते हजर होते. मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाऐवजी अंमलबजावणी करावी अशी मागणी बैठकीतल्या शेतकरी नेत्यांनी केली आहे. तसंच 8 तारखेला नाशिकमध्ये होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेत आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं समजतं आहे.