बुलढाणा : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील देऊळगावमही इथे काही शेतकऱ्यांनी वीज कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतलं. वीज सुरु करा, अन्यथा विष घेऊ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या प्रकारामुळे देऊळगाव मही वीज कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. ग्रामीण भागात तर 15 दिवसापासून वीज गायब आहे. अगोदरच रात्रीची वीज केवळ एक तास तीही कमी दाबाची मिळत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही, शेतकरी रात्र जागवून पिकांना पाणी देण्यासाठी विजेची वाट पाहतोय मात्र वीज वितरण कंपनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष करत आहे.
या प्रकाराला कंटाळून देऊळगावमही इथले काही शेतकरी विषाच्या बाटल्या घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले आणि स्वतःला कोंडून घेतलं. जोपर्यंत वीज देत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही. वीज सुरु करा, अन्यथा विष पिऊन आत्महत्या करतो, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली. यामुळे मात्र एकाच गोंधळ उडाला आहे.
घटनास्थळी देऊळगांवराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे काहीही करु शकत नसल्याने पोलीस हतबल झाल्याचे दिसले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देऊळगावमही परिसरातील वीज लाईन तात्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महामार्गावरच राजरोसपणे अवैध वीज जोडणीद्वारे अवैध बायोडिझेल पंप सुरु
एकीकडे शेतकऱ्यांना वीज मिळत नसताना बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र 06 वर मलकापूर नजीक अनेक अवैध बायोडिझेल विक्री करणारे पंप थाटण्यात आले आहेत. या पंपावर अवैधपणे विद्युत पुरवठा घेऊन राजरोसपने हे सर्व सुरु आहे. परंतु प्रशासन मात्र याविषयी काहीही बोलायला तयार नाही. अवैध वीज पुरवठा घेणाऱ्या पंपावरील वीज जोडणी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या पंपावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता अवैध वीज जोडणीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं तर वीज वितरण अधिकारी याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत.