मुंबई : महाराष्ट्र सरकारनं जाहिर केलेल्या कर्जमाफीसाठी चक्क महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांनीही अर्ज केल्याचं आता उघड झालं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून ही माहिती उघड करण्यात आली आहे.


मुंबईतून असे जवळपास 14 हजार कर्जमाफीचे अर्ज आल्याचा तपशील माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळाला आहे. हे कर्जमाफीचे अर्ज  उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली, लखनऊ, प्रतापगड तर कर्नाटकातल्या विजापूर, गुजरातमधल्या सुरत आणि तेलंगाणामधल्या अदिलाबादच्या शेतकऱ्यांनी केल्याचं कळतं आहे.

वास्तविक, हे शेतकरी मूळ इतर राज्यातले आहेत. मात्र त्यांच्या नातेवाईकांच्या आधार कार्डवर पत्ता मुंबईचा असल्या कारणाने त्यांनी राज्यातल्या कर्जमाफीसाठी अर्ज केल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतले काही कथित शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची बातमी आली होती. हे शेतकरी कोण होते याचा स्त्रोत लक्षात आलाय असं म्हणायला हवं.

त्यामुळे आता अशा अर्जांची नीट पडताळणी करुनच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.