धुळे: धुळ्यात पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हक्काच्या पाण्याची विचारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाने जिल्हाधिकारी कार्यालायावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले.
आता याप्रकरणी 76 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी विना परवाना लाऊडस्पीकर लावून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध दंगल, सरकारी मालमत्तेचे नुकसान आदी कलमान्वये धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
धुळे जिल्ह्यातील सिंधखेडा तालुक्यात उणापुरा 50 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे आख्खा हंगाम वाया गेला. प्यायला पाणी नाही, याची तक्रार करुनही सरकार दाद देत नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयाला घेराव घालत जिल्हाधिकाऱ्यांची गाडीही अडवली. मात्र पाणी मागायला आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं सौजन्य जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली.
या आंदोलनावेळी दगडफेक करुन नदी पात्रातून पळणाऱ्या आंदोलकांना नदीत जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं. अटक केलेल्या आंदोलकांमध्ये युवक वर्गाची संख्या अधिक आहे.
संबंधित बातम्या
शेतकऱ्यांनी पाणी मागितलं, लाठ्या मिळाल्या!