मुंबईः मुंबईसह राज्यामध्ये सध्या डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातलं आहे. डेंग्यूचे डास होऊ नये म्हणून पालिकेकडून फवारणी केली जातच आहे. मात्र प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेणं गरजेचं आहे. परिसरात स्वच्छता ठेवावी तसंच डासांचा कडक बंदोबस्त करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


मुंबई-ठाण्यात डेंग्यूचं थैमान

मुंबईत पडणारा पाऊस डेंग्यू आणि मलेरियांच्या डासांसाठी तारक ठरणारा आहे. त्यामुळेच मुंबई आणि ठाणे डेंग्यू-मलेरियाचं माहेरघर बनलं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण गेल्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

मुंबईत  डेंग्यूचे 160 रुग्ण आहेत. तर 1000 हून अधिक जणांना डेंग्यू झाल्याचा संशय आहे. ठाण्यात डेंग्यूचे 310 रुग्ण आहेत. तर डेंग्यू संशयितांचा आकडा 910 च्या घरात आहे. तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या 1003 आहे.

पुण्यात डेंग्यूसह चिकनगुनियाचं थैमान

डेंग्यूमुळे पुण्याचा तापही वाढलाय. जुलैपासून आतापर्यंत बाराशेंहून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यूही झालाय. पुण्यात डेंग्यूसोबत चिकनगुनियानेही थैमान घातलं आहे.

पुण्यातील चिकुनगुनिया संशयित रुग्णः

जुलै- 27

ऑगस्ट - 119

सप्टेंबरमध्ये आतापर्यंत- 78

विदर्भातही डेंग्यूची साथ

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्येही डेंग्यूची साथ पसरली आहे. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2016 विदर्भात डेंग्यूचे 63 रुग्ण आढळले आहेत.

नागपूर विभागातील रुग्णांची संख्या

नागपूर विभागात 27

नागपूर शहरात 16,

नागपूर ग्रामीणमध्ये 7,

गडचिरोलीत 2,

वर्ध्यात 2

मराठवाड्याला डेंग्यूचा विळखा

जिल्हा          रुग्ण       मृत्यू

औरंगाबाद      12         0

जालना            17        2

परभणी            15        1

हिंगोली           03        0

नांदेड         94         0

लातूर             20        0

उस्मानाबाद    2          0

बीड           22            2

सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक भागात पाणी साचतं आणि हेच साचलेलं पाणी डासांसाठी घर बनतं. त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साठणार नाही. याची काळजी घेणंही आवश्यक आहे.