सांगली : सरकारी तसेच खासगी नोकरदारांना ज्या पद्धतीने दर महिन्याला एकरकमी निश्चित पगाराची रक्कम मिळते, त्याच धर्तीवर राज्य सरकार इथून पुढे शेतकर्‍यांना मासिक पगार देण्याची योजना आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. या योजनेविषयी अधिक माहिती सांगताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, या योजनेमध्ये चार महिने फक्त त्या संबंधित शेतकर्‍याने सरकारकडे हप्ते भरावयाचे आहेत. उरलेले हप्ते सरकार भरणार आहे. यानंतर दरमहा त्या शेतकर्‍याच्या पत्नीच्या बँक खात्यावर सरकारकडून पगार जमा होईल.

या योजनेत चार महिने संबंधित शेतकऱ्याने सरकारकडे हप्ते भरायचे आहेत.

कशी असेल ही योजना
शेतकरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये माल विकतो. त्यावेळी त्याच्या खिशात बर्‍यापैकी पैसा येतो. या कालावधीत शेतकर्‍याने शासनाकडे 30 हजार रूपये जमा करावयाचे आहेत. या दरम्यान चार महिन्यात 30 हजार जमा केल्यानंतर दरमहा नोकरदार वर्गाप्रमाणे ठरलेल्या वेळेत त्यांच्या पत्नीच्या खात्यावर 3 हजार रूपयेप्रमाणे आरटीजीएस करून दिले जातील. अशा प्रकारे 30 हजार रूपये गुंतवणूक केल्यानंतर त्याला 36 हजार रूपये मिळतील. म्हणजे शेतकर्‍याला गुंतवलेल्या पैशावर तब्बल 19 टक्के व्याज देण्याची ही योजना असेल, असे पाटील यांनी सांगितले.