अमरावती : डोक्यावर जिरेटोप, गळ्यात निळा मफलर, अंगात राजेश खन्ना कुर्ता, डोळ्यावर 'दबंग' स्टाईल गॉगल... रावण! मात्र ज्या नावाने लोकप्रियता मिळवून दिली, त्याच नावाने आता न संबोधण्याची तंबी खुद्द भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालील बंदिवासानंतर वर्षभराने बाहेर आलेले चंद्रशेखर आझाद मायावतींचे गुणगाण गातात. पण मायावतींनी त्यांचा डाव वेळीच ओळखल्याचा दावा केला आहे. भीम आर्मी नावाची संघटना पूर्णपणे भाजपचं प्रॉडक्ट असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. मायावतींनी जे म्हटलं त्याचीच चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

भाजपच्या विरोधकांची अनुसूचित जमातीच्या समाजाची मतं फोडण्यासाठी भीम आर्मीचा वापर केला जाणार, असा आरोप होत आहे.  त्यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची कारावासातून सुटका केली. आता उत्तर भारतानंतर भीम आर्मी महाराष्ट्रात सक्रीय होऊ पाहत आहे.

भीम आर्मीचा मार्ग सोपा नाही. मुंबई, कोरेगाव भीमा, लातूर अशा तीन ठिकाणी त्यांच्या सभांना पोलिसांनी परवानगी नाकारली गेली, पण अमरावतीत त्यांच्या सभेला परवानगी मिळाली. तिथे आझादांनी प्रस्थापितांना झोडपून काढलं.

एकीकडे भाजपचा एजंट असल्याची टीका तर दुसरीकडे मात्र प्रकाश आंबेडकरांकडून पाठराखण. आझाद यांच्या भाषणाने काही आंबेडकरी संघटनांच्याही पोटात गोळा आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भीम आर्मीच्या प्रवेशामुळे आपल्या मतांचं काय, अशी भीतीही स्वाभाविकच असणार. त्यामुळे भीम आर्मीमुळे अनुसूचित जमातीच्या मतांची फाटाफूट होणार का? हे येणारा काळच ठरवेल.