अहमदनगर : कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या जिल्हातल्या एका शेतकऱ्याने आज आठवडे बाजारात मोफत कांदा वाटप केले. सरकारचा निषेध करण्यासाठी दानपेटीत पैसे टाकण्याचे आवाहन त्याने केले आहे. दानपेटीत जमा झालेले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार असल्याचे त्याने सांगितले. पोपटराव वाकचौरे असे या गांधीगिरी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून तो पुतनगावचा रहिवासी आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील नेवासेमधल्या पुनतगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने गांधीगीरी करत सरकारचा निषेध केला आहे."आमच्या शेतीमालाला सरकारने गेल्या चार वर्षात दिलेला भाव अगदी योग्य असून आम्ही शेतकरी खूप आनंदी आहोत", असा सरकारच्या अभिनंदनाचा फलकदेखील त्याने लावला आहे.

आठवडे बाजारात पोपटराव वाकचौरे या शेतकऱ्याने 15 क्विंटल म्हणजे दिड टन कांद्याचे मोफत वाटप केले. कांद्याजवळ एक दानपेटी ठेवली आहे. या पेटीत जमा होणारे दान सरकारच्या झोळीत टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत बोलताना वाकचौरे म्हणाले की, "आम्ही लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शनिवारी संगमनेर येथील एका तरूण शेतकऱ्याने तीन टन कांदा विकला सर्व खर्च वगळून त्याला अवघे सहा रुपये मिळाले. अशी परीस्थिती असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचे?"