पंढरपूर : डोळ्यासमोर ध्येय ठेवून निराश न होता सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पंढरपूरच्या ग्रामीण भागातील दोन मुलांनी केंद्रीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावातील निवृत्त पोलीस हवालदारांची कन्या डॉ अश्विनी वाकडे हिनेही वडिलांच्या कष्टाचे गोड फळ दिले आहे. ग्रामीण भागातील मुलांनी जिद्द ठेवल्यानेच हे यश मिळाल्याचे आता ही मुले सांगतात.


पंढरपूर तालुक्यातील खर्डी सारख्या छोट्याश्या गावातील राहुल चव्हाण या तरुणाने UPSC च्या परीक्षेत थेट 109 रँक मिळवला आहे. खर्डी आणि पंढरपूर मध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी पुणे येथे राहुल ने प्रवेश घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत upsc परीक्षेत पास व्हायचे हे उद्दिष्ट व जिद्द बांधत त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. आई वडील अशिक्षित असूनही त्याने मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे . "ग्रामीण भागातील मुलांनी मनात न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केल्यास यश मिळेल", असे राहुल सांगतो . आता राहुलला IAS किंवा IPS ची पोस्ट मिळू शकते मात्र त्याला IAS व्हायचे असल्याने त्याने पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे .


पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुख याने तर सलग तीन परीक्षा पास करून दाखविल्या आहेत . पहिल्या प्रयत्नात निवड झाल्यावर त्याने ट्रेनिंग संपवून मिळालेले पद त्याने स्वीकारले. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याला रेल्वे विभागात यश आले आणि आता तिसऱ्या प्रयत्नात त्याला 151 रँक मिळाल्याने यंदा त्याला IPS हे पद मिळण्याची शक्यता आहे . शेतकरी कुटुंब असून देखील घरच्याने दिलेल्या पाठिंब्याने अभयला हे यश मिळाले आहे . यंदा तर नोकरी करत असल्याने थोड्याफार प्रयत्नातही त्याला हे यश मिळाले आहे. "जे कराल ते अचूक करा आणि कधीही अपयशाने निराश न होता अभ्यास केल्यास हमखास यश मिळते", असे अभय सांगतो


अधिकाऱ्याचे गाव अशी ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील निवृत्त पोलीस हवालदार तानाजी वाकडे यांची कन्या डॉ अश्विनी वाकडे हिने वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले. नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अश्विनी हिने बी जे मेडिकल कॉलेज मधून MBBS ची पदवी घेतल्यावर यूपीएससीसाठी प्रयत्न सुरू केले. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी मधून मार्गदर्शन घेत तिला हे यश मिळाल्याचे अश्विनी सांगते.


संबंधित बातम्या :