उस्मानाबाद: अनंत अडचणीतून मार्गक्रमण करणारा बीड, लातूर, उस्मानाबादचा शेतकरी आज आनंदोत्सव साजरा करतोय. कारण आहे 'वेळा अमावास्येचं'. समस्त शेतकरी बांधवांचा जणू आज सणच. शेतकरी राजा धरणी मातेची पूजा करून मित्र मंडळी आणि पाहुण्यांना मेजवानी देतो. वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी शेतीशिवार आज गर्दीनं फुलून गेली होती. यात मुस्लिम कुटुंबही मागे नाहीत.
दुष्काळ असो कि सुकाळ. पाऊस असो किंवा नसो. प्रत्येक शेतकरी वेळा अमावस्या मात्र जोरात साजरी करतो. आजही हेच चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत धरणी मातेची पूजा केली. चांगल पीक यावं, शेतीमालाला चांगला भाव मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली.
धरणी मातेच्या पोटातून भरघोस पीक यावं असं साकडं घातलं. शेतात पाच पांडवांची पूजा मांडण्यात आली होती. आज शेतकऱ्याने धान्य लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी शेतकरी वर्गात वेळा अमावस्येची मोठी उत्सुकता असते. घरातल्या महिलांची स्वयंपाक बनवण्यासाठी लगबग सुरु असते. रात्र जागून महिला वेळा अमावस्येचा लज्जतदार मेनू बनवतात. मित्र आणि पाहुणे मंडळी पोट भरून जेवल्यावर त्यांना मिळणारा आनंद वेगळाच असतो. घरात बनवलेला स्वयंपाक गृहिणी आपल्या डोक्यावर घेऊन शेतात नेतात.
पूजा झाल्यावर जेवणाची पंगत बसते. आज शेतात बसून जेवण्याचा आनंद काही औरच असते. यानिमित्ताने दूरचे नातेवाईक आणि मित्र मंडळी एकत्र येतात. वेळा अमावस्येचा मेनू सुद्धा खास असतो. शेतातल्या देवतांना आजच्या जेवणाचा प्रथम नैवेद्य दिला जातो. धरणी मातेची पूजा, खास मेनू आणि गप्पा मारत केलेलं जेवण, यात दिवस कधी संपतो ते कळतही नाही.
शेतातून पीक काढणं आणि त्यातून पैसे कमावणं शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनलं आहे. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत हतबल झालेला शेतकरी धरणी मातेला साकड घालतो. शिवाय शासनाकडेही आशावादी नजरेन बघतो आहे. किती तरी संकट समोर असतानाही आज वेळा अमावस्या साजरी करण्यात बळीराजा कुठेच कमी पडत नाही.