Member of The Legislative Council : सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरु आहे. दरम्यान, यावर्षी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या एकूण 10 विधानपरिषदेच्या आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. यासर्व सदस्यांना काल निरोप देण्यात आला. विधिमंडळाच्या प्रांगणात फोटो सेशन करुन निरोप समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
या 10 आमदारांना निरोप
जून जुलैमध्ये मुदत संपणाऱ्या 10 आमदारांमध्ये भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि संजय दौंड यांचा समावेश आहे. तर भाजपचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण यशवंत दरेकर, भाजपपुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, विनायक मेटे आणि प्रसाद लाड यांना निरोफ देण्यात आला. तसेच शिवसेनेच्या रवींद्र सदानंद फाटक, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या सदस्यांचा कालावधी जून जुलैमध्ये संपत आहे. दरम्यान, यामध्ये शिवसेनेचे ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक यांची मुदत 8 जून 2022 रोजी संपत असून अन्य 9 आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 रोजी संपत आहे.
दरम्यान विधानपरिषदेच्या या 10 जागांसाठी मे महिन्याच्या अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे.याशिवाय ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांची मुदत संपत आहे. विधानसभेतून निवडून देण्याच्या दहा जागांपैकी भाजपचे सहा तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार निवृत्त होत आहेत. सदस्याला निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या 26.19 मतांची आवश्यकता आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील ज्या 10 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्यांनी काल सभागृहात भाषणे केली. यावेळी त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास, केलेली कामे, सभागृहातील विविध अनुभव यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- प्रवीण दरेकर यांच्यानंतर प्रसाद लाड अडचणीत येणार?;करोडपती 'पगारदार' असल्याचा आरोप
- बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली! महात्मा गांधींचा म्हातारा असा उल्लेख करत म्हणाले...