नांदेड : सोलापूर सिद्धेश्वर यात्रेनंतर आता दक्षिण भारतातील सुप्रसिध्द असणारी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाची यात्रा कोरोना काळामुळे रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून व्यापारी वर्गाला स्टॉल न लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज फक्त देवस्वारी मिरवणूक काढून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाअर्चा संपन्न होणार आहे.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाच्या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ही जुनी परंपरागत यात्रा यंदा पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे. आज सकाळी विधिवत पूजा करून देवस्वारी निघणार आहे. विशेषतः देवस्वारी मिरवणूक संपूर्ण गावातून न निघता फक्त मंदिर परिसरात निघणार आहे. देवस्वारी मंदिर गेटच्या बाहेर जाणार नसल्याची माहिती मंदिर विश्वस्त दयानंद पाटील यांनी दिली आहे. माळेगाव येथील यात्रा दरवर्षी चार दिवस चालते. जिल्हा परिषदेकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केलं जातं. परंतु आज ही यात्रा रद्द करणयात आली आहे. माळेगाव येथील खंडोबा यात्रा रद्द करण्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कारण माळेगाव यात्रेत मोठ्या प्रमाणात बारा बलुतेदार, शेतकरी यांचे ग्रामीण उद्योग, कृषीधन या यात्रेत विक्रीसाठी उपलब्ध असतं. त्याचा निश्चितच परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उलाढालीवर होणार आहे.
सोलापूरमधील प्रसिद्ध सिद्धेश्वर यात्रा रद्द
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रेसाठी मंदिर समितीने पाठवलेल्या प्रस्तावावरुन आज रात्री उशीरा प्रशासनाने आपले आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध मर्यादा घालून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना यात्रा काळात मंदिरात प्रवेश बंद असणार आहे.
12 जानेवारी पासून 16 जानेवारी पर्यंत सिद्धेश्वरांच्या यात्रेच्या प्रमुख धार्मिक विधी पार पडत असतात. मात्र या धार्मिक विधींवर देखील प्रशासनातर्फे मर्यादा घालण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत पालिकेच्या आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. विविध राजकीय मंडळीनी यात्रेसाठी परवानगी मागताना 1 हजार लोकांना उपस्थित राहता यावे यासाठी मागणी केली होती. मात्र राजकीय मंडळीच्या या मागणीला प्रशासनाने फेटाळत यात्रेवर मर्यादा घातल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनाच्या काळात होणाऱ्या सिद्धेश्वरांच्या यात्रेवर निर्बंध, सर्वसामान्यांसाठी मंदिर राहणार बंद