मुंबई : प्रसिद्ध मराठी लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेखा कुडची यांचा हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या प्रदेश सरचिटणीस सविता माल्पेकर, ज्येष्ठ अभिनेत्री आणि पुणे जिल्हाध्यक्षा प्रिया बेर्डे, ख्यातनाम गायिका आणि विदर्भ विभागाच्या अध्यक्षा वैशाली माडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पक्षाकडून लगेच सुरेखा कुडची यांची राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुडची यांनी आतापर्यंत 50 वर मराठी चित्रपटांसह काही हिंदी चित्रपटांतही अभिनय केला आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या लावणी नृत्यावर संपूर्ण महाराष्ट्राला थिरकायला लावलं आहे.
कोण आहेत सुरेखा कुडची? :
सुरेखा कुडची या एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नर्तिकादेखील आहेत. गेल्या तीन दशकांपासून त्या चित्रपटसृष्टीशी जुळल्या आहेत. त्या 1997 मध्ये चित्रपट अभिनय क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं आहे. त्यांचा पहिला मराठी चित्रपट ' अशी असावी सासू' हा आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. 'भरत आला परत', 'तुच माझी राणी', 'सासुची माया', 'खुर्ची सम्राट', 'तीन बायका फजिती ऐका', 'फॉरेनची पाटलीन' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत तसेच त्यांनी 'रुंजी' आणि 'देवयानी', 'चाहूल 2' या मालिकांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत बहुचर्चित 'मीना आत्या' ही त्यांची भूमिकाही खुप गाजते आहे.
चित्रपट-मालिका आणि पुरस्कार :
प्रमुख चित्रपट : 'अशी असावी सासू', 'फॉरेनची पाटलीन', 'अरे देवा', "पहिली शेर, दुसरी सव्वाशेर', 'तीन बायका फजिती ऐका', 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'भाऊ माझा पाठीराखा'.... असे अनेक सिनेमे त्यांनी केले
मालिका : 'देवयानी', 'नकळत सारे घडले', 'स्वाभिमान', 'भाग्यलक्ष्मी', 'नवरी मिळे नवऱ्याला'.
पुरस्कार : 'झी मराठी अवॉर्ड' (उत्कृष्ट खलनायिक), 'झी गौरव पुरस्कार' (सहाय्यक अभिनेत्री : 'आरं आरं आबा, आता तरी थांबा), 'कलादर्पण पुरस्कार' (सहाय्यक अभिनेत्री) 'म टा सन्मान' : ('देवयानी' मालिका- खलनायिकेसाठी), 'राज्य पुरस्कार' ('पोलीसाची बायको' - सहाय्यक अभिनेत्री)
कुडची यांची पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती :
या पक्षप्रवेशानंतर कुडची यांची लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी त्यांना आजच नियुक्तीपत्र प्रदान केलं आहे. कुडची यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना पक्षाच्या माध्यमातून व्यासपीठ आणि देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी यावेळी "माझा'शी बोलतांना स्पष्ट केलं. तर पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचं सुरेखा कुडची यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी चित्रपट विभागात वाढलं कलाकारांचं 'इनकमिंग' :
राज्यात शिवसेना आणि मनसेच्या चित्रपट आघाड्या सक्रिय आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादीनं चित्रपट क्षेत्रात आपलं संघटन बळकट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालविले आहेत. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत मराठी-हिंदी चित्रपट क्षोत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका प्रवेश करीत आहेत. पक्षाच्या चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथील बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांनी पक्षाची चित्रपट आघाडी मजबूत करण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना पक्षाशी जोडलं आहे. जेष्ठ अभिनेत्री, सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत अलिकडच्या काळात राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे.