जळगावमध्ये बनावट नोटांची छपाई करणारं रॅकेट उद्ध्वस्त
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 31 May 2017 06:26 PM (IST)
जळगाव : जळगावच्या जिल्ह्यात बनावट नोटा छापणारं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. 100 रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. जळगावच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात बनावट नोटा बनवणारं हे रॅकेट सक्रिय होतं. गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांची छपाई सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत मंगळवारी रात्री पोलिसांनी त्रंबकनगरमध्ये छापा टाकून या तरुणांच्या घराची झडती घेत 100 रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या बनवण्याचं साहित्यही जप्त केलं. या संदर्भात पोलीस तरुणांकडून माहिती घेत आहेत. या बनावट नोटांमागे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.