Akola: अकोल्यात शिवसेना आमदाराच्या घरी इंटेलिजन्स ब्युरोच्या चौकशीच्या नावाखाली तोतया अधिकारी घरात घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एप्रिल फुलच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिलला ही घटना घडली आहे. मुर्तिजापूर रोडवरील राधाकृष्ण टॉकीज परिसरात शिवसेना आमदार विप्लव बाजोरिया आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी याप्रकरणी प्रतिक गावंडे या तरूणाला अटक केली. त्याला लगेच जामिनही मिळालाये. प्रतिकची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं समोर आलं आहे. 


 इंटेलिजन्स ब्युरोच्या तोतया अधिकाऱ्याचं 'एप्रिल फुल' 
अकोल्यातील मुर्तिजापूर मार्गावरील आमदार विप्लव बाजोरिया आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्या घरी गुरुवारी आणि शुक्रवारी मोठी खळबळ उडाली होती. याचं कारण होतं त्यांच्या घरी चौकशीसाठी आलेल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचं. मात्र, हा अधिकारी खरा नव्हता. तर, तो तोतया आयबी ऑफिसर होताय. याप्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी प्रतिक गावंडे या तरूणाला अटक केली. तो दोन दिवसांपासून बाजोरियांच्या घराची रेकी करीत असल्याचं समोर आलं. त्यानं बाजोरिया यांच्या घरी आपल्या कारने गेला. आपण 'आयबी ऑफिसर आहोत, अन तुमची चौकशी करायला आलो आहो असं सांगितलं. यानंतर त्याने थेट गाड्यांच्या आणि घरांच्या कागदपत्रांची मागणी केली. सोबतच त्याने दोन गाड्यांच्या चाब्याही ताब्यात घेतल्याचं समोर आलं. मात्र, बाजोरिया यांच्या परिवारातील काही जणांसह सुरक्षा रक्षकांना त्याच्यावर संशय आल्यानं त्याची उलटतपासणी सुरू केली. अन त्याचं खरं बिंग फुटलं. प्रतिकची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं समोर आलं आहे. 


कोण आहे प्रतिक गावंडे? 
प्रतिक गावंडे हा अकोला शहरातील दुर्गा चौक भागात राहतो. प्रतिक उच्चशिक्षित इंजिनियर तरूण आहे. त्यानं 'केमिकल इंजिनिएरींग'मध्ये आपलं  शिक्षण पुर्ण केलं आहे. इंग्रजीवर प्रचंड प्रभूत्व असलेल्या प्रतिकचा आंतरारष्ट्रीय राजकारणाचाही दांडगा अभ्यास आहे. आरोपी प्रतिक गावंडेला वाहनांवर असलेल्या युनिक नंबरचे फोटो काढण्याचा शौक आहे. त्यामुळे तो सतत विविध वाहनांचे फोटो काढत असतो. 2011 मध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'मध्ये अधिकारी असलेल्या त्याच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तेंव्हापासूनच तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर त्याला कुटूंबियांनी उपचारासाठी मानसोपचार केंद्रात हलविल्याचं सांगण्यात आलं आहे. 


वेळ पडल्यास संरक्षणाची मागणी करणार: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया
दरम्यान, आधी हे प्रकरण सहज घेतलेले माजी आमदार बाजोरिया आता अधिक सावध झाले आहेत. प्रतिक गावंडेसारखं कुणीही घरात घुसणं धोकादायक असल्याचं माजी आमदार बाजोरिया 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणालेत. या घटनेनंतर त्यांनी आपल्या घराची सुरक्षा कडक करण्याचे आदेश आपल्या खाजगी सुरक्षा रक्षक आणि चौकीदारांना दिले आहे. वेळ पडल्यास भविष्यात सरकारकडे संरक्षणाची मागणी करणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलं आहे. 


 एप्रिल फुलच्या दिवशी तोतया इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्याने बाजोरिया कुटूंबियांची काहीशी धांदल उडाली आहे. मात्र, प्रतिक नेमकं बाजोरियांच्याच घरी का गेला?, याचा तपास अकोला पोलिसांना करावा लागणार आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha