फेसबुकवरची 'फेक' पोस्ट एका क्लिकवर समजणार, फेसबुकचं राज्यातलं पहिलं फिल्टर सेंटर औरंगाबादमध्ये
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 13 Feb 2019 05:51 PM (IST)
निवडणुकीच्या काळात फेसबुकवर वायरल होणाऱ्या 'फेक' पोस्टवर आळा घालण्यासाठी फेसबुकनं पाऊल उचललं आहे. त्यासाठीचं राज्यातील पहिलं फिल्टर सेंटर औरंगाबादमध्ये सुरु करण्यात आलं आहे.
औरंगाबाद : निवडणुकीच्या काळात फेसबुकवर वायरल होणाऱ्या 'फेक' पोस्टवर आळा घालण्यासाठी फेसबुकनं पाऊल उचललं आहे. त्यासाठीचं राज्यातील पहिलं फिल्टर सेंटर औरंगाबादमध्ये सुरु करण्यात आलं आहे. फेसबुकवरील एखादी पोस्ट शेअर करताना त्या पोस्टमधील मजकूर खरा आहे की खोटा हे आता एका क्लिकवर समजणार आहे. फेक पोस्टवर आळा घालण्यासाठी फेसबुकनं देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिल्टर सेंटर सुरु केले आहेत. त्यासाठी काही सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत फेसबुकनं करार केला असून त्यांना फेसबुक पोस्टची सत्यता तपासण्याचं काम देण्यात आलं आहे. औरंगाबादमधील फेसबुकच्या फिल्टर सेंटरमध्ये मराठी, हिंदी आणि मल्याळम या तीन भाषेच्या फेसबुक पोस्टची सत्यता तपासली जाणार आहे. यासाठी 9 कॅटेगरी तयार करण्यात आल्या असून त्याद्वारे फेसबुक पोस्टची सतत्या तपासली जाणार आहे. फेसबुकवर वायरल होणाऱ्या पोस्टबाबत पुर्ण माहिती येथे तपासली जाते. वायरल होत असलेली पोस्ट जर फेक असेल तर त्याखाली तशी सुचना दिली जाते.