चंद्रपुरात मेव्हण्याच्या हत्येचा कट रचणारा नेत्ररोगतज्ज्ञ गजाआड
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 06:09 PM (IST)
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रसिध्द नेत्ररोगतज्ञ डॉ.चेतन खुटेमाटे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टर खुटेमाटे यांच्यावर आपल्याच मेव्हुण्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ.चेतन खुटेमाटे आणि त्यांचा साथीदार गजानन पाल याला अटक करण्यात आली. आज सकाळी डॉ. मनीष मुसळे यांनी चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत येऊन डॉ.खुटेमाटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आपल्या तक्रारीसोबत फिर्यादी मुसळे यांनी सुपारी आणि हत्येसंबंधी डॉ.खुटेमाटे आणि सीन्नू मिसाला यांच्यात झालेल्या मोबाईल रेकॉर्डिंगची सीडीही सादर केली. हत्येच्या कटाचं बिंग कसं फुटलं? हत्येच्या कटाची सुपारी देण्याची मुख्य भूमिका बजावणारा गजानन पाल हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी चंद्रपूर शहराध्यक्ष आहे. त्याने सीन्नू मिसाला याला सुपारी दिली. सीन्नू मिसाला याने एका मित्राच्या माध्यमातून डॉ. मनीष मुसळे यांना त्यांच्या हत्येची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉ. मुसळे आणि सीन्नू यांनी मिळून डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या विरोधात पुरावे गोळा केले आणि बिंग प्रकरणाचं बिंग फुटलं.