बुलडाणा : बुलडाण्यातील मोताळा येथील स्वॅब न घेताच एका नागरिकाचा  कोरोना रिपोर्ट पॉसिटिव्ह आल्याची घटना ताजी आहे. त्यात आता एका कोरोनाबाधित रुग्णाला मुदतबाह्य औषधे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी भागातील संग्रामपूरमधील आरोग्य विभगाचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे.


संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावातील 18 वर्षीय युवक कोरोना तपासणीसाठी संग्रामपूर येथील कोविड सेंटर येथे गेला होता. त्याची रेपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याचा स्वॅब RT-PCR टेस्ट साठी बुलडाणा येथील लॅबमध्ये पाठवण्यात आला. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यानंतर संग्रामपूर येथील कोविड सेंटर येथून या युवकाला मुदतबाह्य औषधे देण्यात आली. चार ते पाच दिवस औषधे घेतल्यावर युवकाच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान सत्य जाणून घेण्यासाठी एबीपी माझा त्या गावात पोहचल्याची माहिती मिळताच काही आरोग्य कर्मचारी युवकाच्या घरी जाऊन मुदतबाह्य औषधे परत देण्याची विनंती करत होते. याबाबत संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध निर्माता प्रशांत बोन्द्रे यांनी ही औषध संग्रामपूर केंद्रातील नसल्याचं सांगितलं.



बुलढाण्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. त्यातच अपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या व यामुळे होणाऱ्या चुकांमुळे रुग्णांला काही झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जात आहे.


स्वॅब न देताच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह


बुलडाण्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी मोताळा शहरात असलेले नागरिक पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी केवळ आपली नाव नोंदणी केली. त्यानंतर कोविड सेंटरमधून त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे. कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पंडितराव यांना धक्का बसला होता.