Coronavirus : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल राज्यात 3 हजार 900 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. या जिल्ह्यांमध्ये नियमांचे पालन न केल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या लाटेच्या तुलनेत महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेमध्ये 150 टक्के रुग्ण जास्तीचे आढळण्याची भीती असल्याचे केंद्राने म्हटले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडीयाने दिले आहे.
दरम्यान, राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. 14 डिसेंबरला राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही 6 हजार 481 होती, ती 28 डिसेंबरला 11 हाजर 492 झाली आहे. रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. तर मुंबईत यादरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 हजार 769 रुग्णांवरुन 28 डिसेंबरपर्यंत 5 हजार 83 झाली आहे. अशातच आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये राज्यात 150 टक्के रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. औषधे आणि नवीन औषधांच्या निर्मितीसाठी 4 हजार 235 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. यामध्ये राज्य सरकारे 1 हजार 100 कोटी, केंद्र सरकार 1185 कोटी, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि जिल्हा नियोजन व विकास परिषद यांच्याकडून 2000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा सर्व निधी आरोग्यासाठी वापरण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील, असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी आधी 31 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावली होती, त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून सात जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावण्यात आली आहे.
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे येणाऱ्या कोरोनाच्या सुनामीत आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होण्याचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मागील काही दिवसांमध्ये जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर, जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी पुढील वर्षात कोरोनाचा जोर ओसरणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: