नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये मुंबईचा अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु होती. आज त्याबाबत एक महत्वाची राजकीय घडामोड घडलीय. बाळासाहेब थोरात हे सध्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून आज दिल्लीत त्यांनी पक्ष संघटनेतल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन आपली भूमिका कळवली आहे. बाळासाहेब थोरातांनी हे पाऊल नेमकं का उचललं? त्यांचा राजीनामा मंजूर होणार का? नवीन प्रदेशाध्यक्ष मग कोण होणार? अशी सगळी चर्चा त्यामुळे सुरु झालीय.


एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार का अशी चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात हे स्वत:च हे पद सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. आज दिल्लीत येऊन त्यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा स्वीकारुन महाराष्ट्रात हायकमांड बदलाचे संकेत देणार का याची उत्सुकता आहे.


खरंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद येऊन आत्ता अवघं दीड वर्षच झालं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर थोरातांकडे प्रदेशाध्यक्षपद आलं. काँग्रेसला सन्मानजनक 44 जागा मिळाल्या, सत्तेत सहभागाची संधी मिळाली ही त्यांच्याच नेतृत्वात. पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेस कुठे दिसत नाही. काँग्रेसला दुर्लक्षित केलं जातंय ही टीकाही त्यांच्या नेतृवावर सुरु झाली.


काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु केलंय. बाळासाहेब थोरात यांच्याकडे एकाचवेळी महसूलमंत्रीपद, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद अशी तीन पदं आहेत. शिवाय त्यांचे भाचे सत्यजीत तांबे हेच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सत्तेचं केंद्रीकरण होत असल्याचा काँग्रेसमधल्या एका गटाचा आरोप आहे.


मध्य प्रदेश, राजस्थानात एकाच व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रीपद काँग्रेसनं बराच काळ ठेवलेलं होतं. त्यामुळे या केवळ एकाच मुद्द्यावर थोरात यांच्या विरोधात कॅम्पेन यशस्वी होऊ शकत नाही. पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसचं महत्व अधोरेखित करण्यासाठी नवे प्रभारी एच के पाटील काही नवा बदल करतात हे पाहणं त्यामुळे महत्वाचं असेल.


बाळासाहेब थोरात यांनीही गेल्या दोन महिन्यात दिल्लीत गाठीभेटी केल्या होत्या. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे देखील विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदात रस दाखवत होते. विदर्भातले इतरही अनेक प्रबळ दावेदार सातत्यानं पुढे येतायत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा फायनल झाला तर राज्यात काँग्रेसची धुरा कुणाकडे येणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.


कोण कोण प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत?


- विदर्भातून नितीन राऊत, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवर हे प्रदेशाध्यपदाच्या रेसमध्ये आहेत.
- मराठवाड्यातून अमित देशमुख, पश्चिम महाराष्ट्रातून संग्राम थोपटे यांच्याही नावाची चर्चा आहे.


राजकारणात वेळीच त्यागाची तयारी दाखवली की नैतिक वजन टिकून राहतं याची जाणीव बाळासाहेब थोरातांनाही असणारच. थोरातांच्या भूमिकेबाबत पक्षाला निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हे बदलाचं वारं आता किती वेगानं वाहणार आणि तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्याचा कसा परिणाम होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.


Balasaheb Thorat | प्रदेशाध्यक्ष बदलासाठीच्या लॉबिंगमुळे बाळासाहेब थोरात नाराज?