नागपूर : अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याने ओबीसींना या कायद्यातून वगळा, अशी मागणी भाजप खासदार नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमात पटोले बोलत होते.


 

"अॅट्रॉसिटी कायदाच्या गैरवापराचा सर्वाधिक परिणाम ओबीसींवर झाला आहे. दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याचा आरोप झाल्यास ओबीसीवर अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करु नका, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. यासंदर्भात दलित संघटनांशी बोलण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

 

दरम्यान, जे दलितांवर खरोखर अन्याय करतात त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

 

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या पुनर्विचाराची मागणी केली होती. या मागणीला दलित संघटनांनी कडाडून विरोध केला होता.

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?
कोपर्डीत झालेल्या बलात्कारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरीयतसारखा कायदा देशात लागू करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. तसंच जर अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला पर्याय शोधला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते.