मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि संघर्ष कृती समितीचे सदस्य यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
'राज्यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली असून या समितीचा निर्णय आल्यावर विभाजनाचा निर्णय घेऊ' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगरचं विभाजन होणार?
अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार हाकणंही अवघड होत असल्यामुळे ही मागणी केली जात आहे.
अहमदनगर जिल्हा कृती समितीने भौगोलिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या जिल्ह्याचं विभाजन का व्हावं, याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं.
जिल्हा विभाजन करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नसून संगमनेर जिल्हा कृती समितीने प्रस्ताव देताना दिलेलं निवेदन हे लक्षवेधी असल्याचं स्पष्ट केलं. समितीने संगमनेर जिल्हा का व्हावा, यासाठी दीड लाख सह्या असलेल्या प्रती सोबतच संगमनेर जिल्हा कसा योग्य आहे याबाबत प्रेझेंटेशन दिलं.
या निवडणुकीपूर्वी अहमदनगरचं विभाजन होणारच : राम शिंदे
नगरचे दोन भाग व्हावेत ही लोकांची भावना आहे आणि येत्या निवडणुकीपूर्वी अहमदनगरचं विभाजन होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली होती.