यवतमाळ : माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. महिलेने या प्रकरणी आमदार राठोड यांच्या विरुद्ध घाटंजी पोलिस व पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठविले होते. त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच संदर्भात आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली आहे. 


माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या विरुद्ध पोलिसात पत्र पाठवून तक्रार अर्ज पाठविणाऱ्या महिलेचा जबाब नोंदविण्यासाठी आज अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली एक पोलिसांचे विशेष पथक गठीत झाले. तेच पथक आज त्या संबंधित महिलेच्या गावात गेले तेव्हा त्या महिलेने माझ्या वडिलांनी प्रकृती बरोबर नसल्याने आणि माझी मनस्थिती बरोबर नसल्याने आज मी बयान देऊ शकत नाही असे लेखी निवेदन दिले होते. अखेर आज बयान देण्यासाठी महिला घाटंजी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. यावेळी पथक प्रमुख अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्यासह अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे, घाटंजीचे पोलिस निरीक्षक बबन कराळे, सायबर सेल, महिला सेल, भरोसा सेल प्रमुख उपस्थित होते. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर संबंधित महिलाही चारचाकी वाहनांमध्ये गावाकडे परतली.


घाटंजी पोलीस ठाण्यात विशेष पथक दाखल
घाटंजी तालुक्यातील एका पीडित महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात महिलने घाटंजी पोलिसांना पत्र पाठविले होते. त्याच प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक गठीत केले होते. हेच पथक आज घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर ते तक्रारदार महिलेच्या गावात गेले.


राठोड पुन्हा अडचणीत
काही महिन्यापूर्वी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.