जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे खडसेंसह पदाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतोय. अनेकदा पाठपुरावा करुनही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने खडसेंनी आता थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.


पाणीटंचाई कृती आराखडा गेल्या चार महिन्यांपासून मंजुरीसाठी प्रशासनाकडे अडकून पडला आहे. हा आराखडा त्वरित मंजूर करावा,  मागणी असलेल्या प्रत्येक गावात टँकर सुरु करावं, अशी मागणी खडसेंनी सरकारकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषण करावं लागेल, असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.

एकनाथ खडसे यांनी पाण्यासोबतच इतर समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.

एकनाथ खडसे आणि पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची समस्या गंभीर असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. कृती आराखडा त्वरित मंजूर करावा, तो मंजूर होईपर्यंत मतदार संघातील 80 गावात टँकर उपलब्ध करून द्या, अन्यथा उपोषण करावं लागेल, असा इशारा यावेळी खडसेंनी दिला.

दरम्यान खडसेंच्या या आक्रमक भूमिकेने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. खडसेंच्या कार्यकर्त्यांमध्येही सरकारविरोधात रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाणीटंचाईसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा खडसेंच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे तब्बल 20-20 दिवस नळाला पाणी नसल्याने नागरिकही आक्रमक झाले आहेत.