Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये संशयाचं वातावरण असतानाच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अक्षरश: चिरफाड केली. त्यांनी अनेक उदाहरणे दिली. हा निकाल एक प्रकारे मान्य नसल्याचे सांगितले. लोकांनी आपल्याला मतदान केलं. मात्र, आपल्यापर्यंत पोहोचले नाही, मध्येच गायब झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. ज्या अजित पवार यांच्या पक्षाला तीन ते चार जागा मिळतील असं वाटत सुद्धा नव्हतं, त्या पक्षाला 43 जागा? असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी मनसेच्या आमदार राजू पाटील यांच्या गावाचा सुद्धा दाखला देत जितकं मतदान होतं तितकं सुद्धा मतदान झालं नसल्याचे सांगत एक प्रकारे या निवडणुकीतील निकालावर खोचक शब्दांमध्ये भाष्य केलं. राज ठाकरे यांनी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा दाखला दिला.
बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले ते यावेळी दहा हजार मतांनी पराभूत झाले
राज ठाकरे म्हणाले की बाळासाहेब थोरात 60 ते 70 हजार मतांनी निवडून येत होते, जे सातवेळा आमदार झाले ते यावेळी दहा हजार मतांनी पराभूत झाले. या सर्व पार्श्वभूमीवर इतका अभूतपूर्व निकाल लागून सुद्धा महाराष्ट्रामध्ये निकालानंतर जल्लोष दिसून आला नाही. सर्वत्र सन्नाटा दिसून आला. या निकालानंतर निवडून आलेल्यांना सुद्धा विश्वास राहिला नाही. दररोज रात्री ते बायकोला चिमटा काढ असे म्हणत असतात, असे सांगत राज ठाकरे यांनी खोचक शब्दांमध्ये भाष्य केले.
इतना सन्नाटा क्यू है भाई? कोई तो जीता होगा?
ते पुढे म्हणाले की संघाची लोक सुद्धा एकवेळा माझ्याकडे आले होते. त्यांनी सुद्धा दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते विचारत होते की इतना सन्नाटा क्यू है भाई? कोई तो जीता होगा? अशी प्रतिक्रिया दिली होती. राज ठाकरे यांनी सांगितले की, लोकसभेला काँग्रेसने सर्वात जास्त खासदार निवडून आणले, पण त्यांचेही 15 आमदार निवडून येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार असून 10 आमदार आले. ज्या अजित पवार यांचा 1 खासदार निवडून आला, त्यांचे 42 आमदार झाले. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केले ते आपल्याकडे आले नाही. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर न लढवलेली बरे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही गोष्ट निघून जाईल, पण कोणी अमर पट्टा घेऊन आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या