सांगली : 2014 साली जे गृहस्थ पंतप्रधान झाले त्याची मानसिकता या 7 वर्षांत बदलली आहे. शेतकऱ्यांना चिरडून जरी मारले तरी आपल्या देशाचे पंतप्रधान साधे दुःख व्यक्त करत नाहीत. निषेध व्यक्त करत नाहीत, ना खेद व्यक्त करतायत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लखीमपूरमधील घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर हल्ला चढवलाय. पुणे पदवीधर निवडणुकीत प्रथम पसंतीच्या विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार कुंडलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, सत्कारमूर्ती आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागले की, भाजपच्या नेत्यांना सहन होत नाही : जयंत पाटील
दररोज इंधन दरवाढ करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. आपल्या भारतातील शेतकर्याला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे अशी मानसिकता आपल्या सरकारची नाही. नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात काम करून त्यांचा गळा घोटण्याचा काम भाजपा करत आहे. शेतकऱ्याच्या हातात चार पैसे मिळायला लागले की, भाजपच्या नेत्यांना ते सहन होत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. प्रत्येक गोष्टीचे खाजगीकरण करण्याचे काम या देशात सुरु आहे. दोन लोक विकत आहेत आणि दोन लोक खरेदी करीत आहेत. अशी परिस्थिती असंही जयंत पाटील म्हणाले.
देशाला वेगळ्या दिशेनं हाकण्याचा कार्यक्रम सुरु : जयंत पाटील
देशातील आजची परिस्थिती बदलली आहे. लखीमपूर सारख्या भागात लोकांना चिरडून टाकण्याची मानसिकता भाजपाची झाली आहे. देशाला एका वेगळ्या दिशेने हाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. देशात आज सरकार विरोधात आवाज उठविला तर लगेच विविध चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. कोणतेही पुरावे नसताना देखील आज राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. लखीमपूर घटनेची तुलना जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी जालियनवाला बाग हत्याकांडशी केली, त्यानंतर देशातील सरकारने अजित पवार यांची चौकशी करण्याचे काम केले. त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. ईडीला भाजपचे नेते मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार सध्या राज्यात धाडसत्र सुरु आहे, अशी टीका जयंत पाटलांनी भाजप नेत्यांवर केली.
सहकार क्षेत्रातील अरुण अण्णाचे काम कौतुकास्पद : जयंत पाटील
क्रांती अग्रणी स्व. जी. डी. लाड बापूंच्या विचारधारेवर कुंडल गाव घडलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा या गावाला लाभला आहे. साध्या सरळ विचार सरणींच्या या गावातील अनेकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्राच्यानंतर आपली वैचारिक लढाई सुरु ठेवली. सहकार क्षेत्रातील अनेक कार्य देखील अरुण अण्णा यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अरुण लाड याचे कौतुक केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :