वाशिम : मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर खरेदी करण्याचे आदेश दिले, तरी अद्याप तूर खरेदीला सुरुवात झाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे, तूर खरेदीत होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यासमोर विविध आर्थिक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


बाजार समितीत 22 एप्रिलपर्यंत तूर आलेली तूर खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्या. यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीत जावून पंचनामे केले. या पंचनाम्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 27 तारखेलाच तूर खरेदीचे आदेश दिले. पण दोन दिवस उलटून गेले, तरीही अद्याप तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे बाजार समितीतील तूर खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून आहेत.

बाजार समितीकडून होणाऱ्या विलंबामुळे तूर घेऊन आणलेल्या वाहनाचं भाडं कसं द्यावं हा नवा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

सध्या बाजार समितीत उभ्या असलेल्या गाड्यांना दिवसाला एक हजार रुपये आकारले जातात. मागील 15 दिवसात प्रत्येक शेतकऱ्याला गाडी भाड्यापायी 15 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. पण तुरीची खरेदीच होत नसल्याने, भाडं कोण देणार असा प्रश शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.

दुसरीकडे ज्या एजन्सीला तूर खरेदीचे आदेश दिले आहेत, त्यांनी अद्यापपर्यंत बाजार समितीला कोणतीच माहिती दिली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

दरम्यान, सध्या सर्वत्र लग्न सराई सुरु आहे. त्यातच मान्सून वेळेवर येणार असा हवामान खात्याचे अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लग्नाचा खर्च आणि खरीप हंगामासाठी जुळवाजुळव कशी करावी ही विंवचना शेतकऱ्यांसमोर आवासून उभी आहे.