वर्धा : डॅशिंग आमदार बच्चू कडू यांचा रुद्रावतार पुन्हा एकदा वर्ध्यात पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षात 36 कामगारांना कामावरुन कमी करणाऱ्या उत्तम गॅल्वा कंपनीच्या प्रशासनासोबत चर्चेसाठी गेलेले आमदार बच्चू कडूंचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांवरच पाण्याची बॉटल भिरकावली. त्यानंतर पोलिसांनी आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का देत कंपनीच्या बाहेर काढलं.
काय आहे प्रकरण?
वर्ध्यातील उत्तम गॅल्वा कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून 36 कामगारांना कामावरुन कमी केले. त्यामुळे प्रशासन आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या कामगारांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.
...आणि बच्चू कडू संतापले!
कामागारांच्या हाकेला साद देत मदतीसाठी बच्चू कडू पुढे सरसावले. उत्तम गॅल्वा कंपनीच्या प्रशासनासोबत चर्चा ते करण्यासाठी गेले. मात्र, “मॅनेजमेंट नाही” असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे आमदार कडू म्हणाले, “मग फोनवर बोलणं करुन द्या.” प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार बच्चू कडू संतापले.
बाटली भिरकावली!
कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागते. यावरुन कंपनीच्या अधिकाऱ्यावर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी पाण्याची बॉटल फेकून मारली. त्यांनतर धक्का देत पोलिस प्रशासनाने बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.
पोलिसांनी कंपनीबाहेर काढल्यानंतर आमदार बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांनी कंपनी बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं. येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा ‘बच्चू कडू स्टाईल’ने 25 हजार लोकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.