उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य केला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. कर्मचारी, भाविकांसह पुजार्‍यांनाही प्रवेशावेळी हा पास सक्‍तीचा असेल.

प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे तुळजापुरात नाराजी व्यक्‍त केली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आजही भाविक मोठ्या संख्येने तुळजापुरात दाखल झाले होते. मंदिर प्रवेशद्वारावर त्यांना पास नसल्याने अडवण्यात आले. धर्मशाळेत हे पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेथून पास घेतल्यानंतर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

मंदिरातील गर्दी कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सांगितले जात आहे. मंदिर व्यवस्थापक (तहसीलदार) सुनील पवार यांनी ट्रस्टच्या ठरावांनुसार याची अंमलबजावणी रविवारपासून सुरु झाल्याचे सांगितले.