पनवेल : चैत्र नवरात्रोत्सवाची काही दिवसांपूर्वीच सांगता झाली. मागच्या वर्षी ज्याप्रमाणं सण- उत्सवांवर कोरोनाचं सावट होतं, तसंच काहीसं चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. सणवारांवर असणारी ही कोरोनाची गडद छाया असतानाही अनेकांनी आपल्याच परिनं या उत्सवांना एक खास वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. तोसुद्धा सर्व नियमांचं पालन करत, घरबसल्या. 


सोशल मीडियावर चैत्र नवरात्रोत्सवाच्या धर्तीवर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. देवीची विविध रुपं या माध्यमातून सर्वांच्याच भेटीला आली, अशाच या पोस्टच्या गर्दीत चर्चेत आहे ती म्हणजे एका कलाकारानं रेखाटलेली आई एकविरा देवीची रांगोळी. 


मुळचा पनवेलजवळच्याच एका गावात राहणाऱ्या रोशन जयवंत पाटील या कलाकारानं ही रांगोळी साकारली आहे. आई एकविरेचं रुप साकारणं ही इच्छा मागील 2, 3 वर्षांपासून रोशन मनी बाळगून होता आणि अखेर त्याला ही संधी मिळाली. लॉकडाऊनच्या काळात वेळ सद्कारणी काढून त्यानं ही रांगोळी काढली आणि त्याची छायाचित्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्या भेटीला आणली. 


Kamada Ekadashi 2021 : चैत्र शुद्ध एकादशी अर्थात अंतःकरणातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी; हरिहरा भेद नाही सांगणारी यात्रा


इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग आणि त्यानंतर नोकरीची जबाबदारी सांभाळून रोशननं त्याची कलेप्रती असणारी आवडही प्राधान्यानं जोपासली आहे. त्यानं रेखाटलेली रांगोळी, त्यातील बारकावे आणि आई एकविरेचं लोभस रुप पाहता सहजपणे त्याच्या कलेप्रती असणाऱ्या समर्पकतेची जाणीव होत आहे. 


पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या रोशनला कला क्षेत्रातही नावलौकिक मिळवण्याची इच्छा आहे. असं असलं तरीही कलेला दाद देण्यापलीकडेही याकडे अर्थार्जनाच्या दृष्टीन पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणखी व्यापक झाला पाहिजे यासाठी तो आग्रही दिसतो. 







आईकडून मिळालेला कलेचा वारसा पुढे चालवत रोशन त्याची अशी वेगळी ओळख या कला जगतात प्रस्थापित करत आहे. सोशल मीडियाच्याच माध्यमातून काही कलाकारंच्या संपर्कात येत वेळ पडल्याच त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेत आहे. याच माध्यमातून त्याला काही गुरुमित्रही मिळाले, ज्यांच्या मार्गदर्शनानं त्याची कलेवर असणारी पकड आणखी मजबूत झाली. अशा या कलाकाराला सध्या अनेकजण विविध माध्यमांतून दाद देत आहेत.