पालघर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेली फूट संपुष्टात आली असून अखेर समेट घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सदस्यांनी नऊ सदस्सिय स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या समेटमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी दरम्यान अपेक्षित सत्तापालट होण्याची शक्यता विरळ झाली आहे. हा करिश्मा जितेंद्र आव्हाड यांनी घडविला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये निवडणूकीपूर्वी समेट झाला होता. निकालानंतर हे पक्ष शिवसेनेबरोबर जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये सहभागी आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने जिल्हा परिषदेमधील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष भाजपाच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात होता.


या अनुषंगाने आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून सहा सदस्यांनी पालघर विकास आघाडी नामक स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यानंतर पालघरमध्ये मोठे रणकंदन माजले. आणि विरोधकांच्याही आशा उंचावल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थानिक पातळीवर कुरबुर असल्याने याबाबत वरिष्ठ पातळीवरील राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही गटाच्या सदस्यांना एकत्र राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांच्या शिफारसीने राष्ट्रवादीचे आठ व काँग्रेसचा एक असा नऊ सदस्यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या समक्ष नव्याने गट स्थापन केला.


राष्ट्रवादी स्थानिक नेत्यांमध्ये तसेच विभक्त झालेल्यामध्ये समझोत्यानुसार या एकत्रित गटाचे नेतेपद सुनिता कमळाकर धूम यांच्याकडे राखण्यात आले असून राष्ट्रवादीच्या वाटेला येणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच बांधकाम व आरोग्य सभापती पद हे पालघर विकास आघाडी गटाच्या सदस्यांना देण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला तूर्त विराम मिळाला आहे. आणि विरोधकांच्या आशेवर विरजण पडले आहे


20 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड पालघर मध्ये येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये दगाफटका होऊ नये या दृष्टीने सर्व पक्षांनी आवश्यक दक्षतेच्या उपायोजना घेतल्या आहेत.