पंढरपूर : यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला होता. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत. गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते. आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले, अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार, यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. कोलते दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेत सहभागी झालं. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न झाली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.