मुंबई : एसटी महामंडळातील पालघर, ठाणे आणि मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील 6 महिन्यांपासून रखडलेले पगार आणि परळ डेपोतील 8 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केल्याप्रकरणी परळ डेपोमध्ये एसटी महामंडळातील चालक वाहकांनी काही काळ काम बंद आंदोलन केलं. यावेळी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. परंतु सध्या मुंबईत कलम 144 लागू असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आंदोलन करू नये अन्यथा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी थांबवली आणि वरिष्ठांसोबत चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यामुळे आंदोलक शांत झाले.


आंदोलनाबाबत बोलताना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मुंबई विभागीय सचिव राजन येल्वे म्हणाले की, मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. यामध्ये पालघर, मुंबई, ठाणे विभागातील कामगार टाळेबंदीत कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव असताना देखील कामावर आले होते. अशा कर्मचाऱ्यांचे पगार एसटी महामंडळाने अद्याप केलेले नाहीत. यासोबतच काही कर्मचारी टाळेबंदीच्या काळात कामावर नव्हते. त्यांना 48 तासांची नोटीस बजावण्यात आली होती. तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी काही कर्मचारी मिळेल त्या वाहनाने मुंबईत पोहचले. कामावर हजर देखील झाले परंतु तरीदेखील आशा कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. यातील काही कर्मचारी असे आहेत की ते परळ डेपोमध्ये येऊन थांबले होते. सध्या कर्मचारी जास्त झाल्यामुळे त्यांना परळ डेपोच्या व्यवस्थापकांनी हजर करून घेतलं नाही त्याला देखील सेवा समाप्तीचं पत्र हातात देण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, एकीकडे हजर होण्यासाठी नोटिसा बजावता आणि दुसरीकडे हजर होऊन देखील कामावरून काढून टाकण्याचा दुटप्पीपणा का? जर या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर कर्मचारी पुन्हा आंदोलन करतील आणि याला प्रशासन जबाबदार असेल.


कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी नागपूरहुन आलेले चालक मेश्राम म्हणाले की, मी तब्बल 950 किलोमीटरचं अंतर दुचाकीवरून पार करून कामावर हजर होण्यासाठी मुंबईत पोहचलो. वेळ वाया जाऊ नये यासाठी भर पावसात गाडी चालवत उपाशीपोटी मुंबईला आलो. ज्यावेळी कामावर हजर राहण्यासाठी गेलो त्यावेळी माझ्या हातात कामावरून काढून टाकण्यात आल्याचं पत्र देण्यात आलं. हे सर्व पाहून मला धक्का बसला. ज्यावेळी मी ते पत्र वाचलं त्यामध्ये काढून टाकण्यात आलेला व्यक्ती दुसराच होता. माझ्या हातात त्या व्यक्तीचं पत्र देऊन तुला काढून टाकण्यात आलं आहे तू घरी जा असं सांगण्यात आलं. मी त्यांना वारंवार सांगून देखील माझं ऐकून न घेता मला घरचा रास्ता दखवण्यात आला आहे. आता तुम्हीच सांगा मी कोणाकडे दाद मागू.