मंदिर प्रश्नावर दबावाला बळी न पडल्याबद्दल लेखक, शास्त्रज्ञांनी पत्र लिहून केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

एबीपी माझा वेब टीम Updated at: 23 Oct 2020 06:19 PM (IST)

राज्यपालांच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सेक्युलर भूमिका घेतली याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 104 लोकांचा यात समावेश आहे.

NEXT PREV

मुंबई: एकीकडे राज्यातील मंदिरे उघडावेत यासाठी प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह इतर अनेक धार्मिक संघटनांकडून राज्य सरकारवर दबाव येत असताना राज्यातील काही महत्वाच्या बुध्दीजीवी व्यक्तींनी कोरोनाच्या काळात धार्मिक भावनांपेक्षा लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याबद्दल आणि राज्याचे राज्यपालांनी मंदिरे उघडावित यासाठी टाकलेल्या दबावाला बळी न पडता ठामपणे भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे.


ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे,लेखिका शांता गोखले कादंबरीकार रंगनाथ पठारे , वैज्ञानिक डॉ.हेमचंद्र प्रधान , कवयत्री नीरजा, नाटककार जयंत पवार , सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे , आयुकाचे माजी डायरेकटर डॉ . नरेश दधीच , चित्रकार सुजित पटवर्धन , शिक्षण तद्न्य विद्या पटवर्धन फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसीचे आशुतोष शिर्के अश्या महाराष्ट्रातील सामाजिक ,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 104 लोकांचा यात समावेश आहे.


या पत्रात म्हंटले आहे की, " शासनासमोर दोन पर्याय आहेत . एकतर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे लोकांच्या श्रद्धांचा विचार करायचा. सेक्युलारिझमचे तत्व असे कि शासनाचे कर्तव्य लोकांच्या ऐहिक (सेक्युलर) हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील तर शासनाने ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूने उभे रहावे. पण राज्यपालांची भूमिका तुम्ही लोकांच्या श्रद्धांच्या बाजूने उभे राहावे अशी आहे. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी असा उपयोग आम्हाला अतिशय आक्षेपार्ह वाटतो. कारण असे श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकारण यशस्वी झाले आणि देवळे उघडली गेली तर ते भाविकांच्यासाठीच धोक्याचे ठरू शकते."


पत्रामध्ये हिंदू परंपरेतील तुकाराम , ज्ञानेश्वरांच्या भागवत परंपरेचा उल्लेख करताना म्हंटले आहे की ," हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी, देव फक्त मंदिरात असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे आम्ही सर्व ही परंपरा मानणारे लोक आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात आनंद असतो पण 'देव देव्हाऱ्यात नाही , देव मूर्तीत ना मावे , तीर्थक्षेत्रात ना गावे , देव आपणात आहे , शीर झुकवोनिया पाहे ' अशी माणसाच्या श्रद्धेला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणेच कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी आहे. "


या पत्रात त्यांनी राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्यासंबंधीचे कलम 25 चा आधार घेऊन असं सांगितले आहे की नागरिकांच्या आरोग्याला बाधा येत असल्यास धर्म स्वातंत्र्यावर आवश्यक ते प्रतिबंध लावण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत.


या पत्रात पुढे म्हंटले आहे कि सेक्युलर व्यक्ती श्रद्धा बाळगणारी, धर्माचरण करणारी असू शकते. पण या व्यक्तीची भूमिका अशी असते की सार्वजनिक हितासाठी लोकांच्या धर्मस्वातंत्र्यावर बंधन आणण्याचा अधिकार हा सेक्युलर शासनाला असतो.
प्रश्न श्रद्धेचा असतो तेंव्हा ठाम भूमिका घेणे कठीण असते असे नोंदवून पत्रात म्हंटले आहे की राज्यपालांच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सेक्युलर भूमिका घेतली याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.




-

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.