सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दौऱ्यावरुन राजकीय वातारवरण तापू लागलं आहे. सोलापूरसाठी उद्या काळा दिवस असणार आहे, शहरात ब्लॅकआऊट करण्यात येणार असल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी केला आहे.
"नरेंद्र मोदींच्या बुधवारी होणाऱ्या सोलापूर दौऱ्याआधी शहरात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. शहरातील रस्ते, केबल सेवा बंद असणार आहे. एकप्रकारची आणीबाणीसदृश स्थिती सोलापूरात लागू झाली आहे. मोदी हुकूमशाह असल्यासारखे वागत आहेत", अशी टोकाची टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे.
"मोदींचा विरोध करण्यासाठी विविध आंदोलनं सोलापुरात होणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील जनता मोंदीना जाब विचारणार आहे, याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळेच सोलापुरात दडपशाही सुरु झाली आहे", असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
मोदींनी निवडणुकीआधी जनतेला मोठमोठी आश्वासनं दिली. मात्र त्यातील कोणतीच आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनता नाराज आहे. त्यामुळे मोदींनी दिलेली आश्वासनं खोटी असल्याचं लोकांना कळू लागलं असल्याची टीकाही प्रणिती शिंदेनी केली.
संबंधित बातम्या
मोदींच्या दौऱ्यानिमित्त सोलापुरात शिक्षकांना कामाला जुंपलं