पंढरपूर : महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकांची उडालेल्या रणधुमाळीत राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जे. एस. सहारिया दररोज एका जिल्ह्यात जाऊन आढावा आणि पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी आयुक्तांनी हेलिकॉप्टरचा मुक्तपणे वापर सुरु केला आहे.


निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांचा पाय जमिनीवर लागणं थोडं कठीण झालं आहे. कारण निवडणुका निष्पक्ष, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सहारिया गेली आठ दिवस हेलिकॉप्टरची भिंगरी करुन फिरत आहेत. देवदर्शन घेत आहेत, पुष्पगुच्छ स्वीकारत आहेत. मग ठरलेल्या बैठकांमध्ये तेच डायलॉग पुन्हा पुन्हा मारत आहेत.

जे एस सहारियांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरातून गगनभरारी घेतली. त्यांची पुण्यात बैठक होती. पण सकाळी सकाळी आयुक्तांना विठ्ठलाचं दर्शन घेण्याची अनिवार इच्छा झाली. मग सहारियांनी पायलटला सांगून हेलिकॉप्टरची वाट वाकडी केली. पंढरीत येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. संस्थानकडून सत्कार स्वीकारला.

जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने सहारियांनी बैठकांचा धुमधुडाका लावला आहे. प्रत्येक ठिकाणी आयुक्त महाशय हेलिकॉप्टरने जातात. प्रत्येक ठिकाणी तेच ते सांगतात. अशा कोणत्याही बैठकांना मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणं शक्य आहे.

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग सुप्रीम पॉवर बनतो. महसूल यंत्रणा अधिकाराचा गैरवापर करुन इतर विभागाच्या गाड्या काढून घेते. शिक्षक, प्राध्यापकांना निवडणुकीची काम देतात. दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचंही भान राहत नाही. हे सगळं करताना निवडणूक आयोगाच्या खर्चाचं कुणीही ऑडिट करत नाही, हे विशेष...

लोकशाही व्यवस्था नीट चालावी, लोकांचा विश्वास कायम राहावा यासाठी प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. पण तसं होत नाही. त्यामुळेच गरज नसताना आयुक्त हेलिकॉप्टरने फिरतात. त्यांच्या अशा फिरण्याने ना निवडणुका सुरळीत होतात, ना निवडणुकीतला काळ्या पैशाचा वापर थांबतो.