मुंबई : 22 डिसेंबरपासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार का? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. मात्र, अखेर यावर निर्णय होणार आहे. येत्या 27 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, 28 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, या निवडीवर भाजपने आक्षेप घेतला आहे.
कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. यानंतर येत्या 28 डिसेंबरला अध्यक्षांची निवडीची प्रकिया पार पडणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार पत्र पाठवणार आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांची निवडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सध्याची कोरोनाची परिस्थिती, शेतकरी प्रश्न यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी असे सुधिर मुनगंटीवार म्हणाले. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही आग्रह धरला की, अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे. मात्र, त्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. येत्या 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
आमचे 12 आमदार निलंबित आहे. निलंबीत केल्यामुळे ते मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत. कोर्टाचा आदेश आहे की, तुम्ही मातदात्यांना वंचित ठेऊ शकत नाही. परंतू, तरीदेखील मतदान होणार आहे. अध्यक्ष निवडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सुधिर मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. अद्याप एसटी (ST)कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. आम्हाला या मुद्यांवर चर्चा करायची आहे. त्यामुळे कालावधी वाढवण्याचा आग्रह धरत असल्याचे पाटील म्हणाले. तर राज्य सरकार हे लोकशाहीचे रक्षक असतील तर कालावधी वाढवतील, भक्षक असतील तर थांबवतील असा टोला यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
महत्तवाच्या बातम्या: