Postpone UP Election : ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 


सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठात जामीन अर्जांवर सुनावणी सुरु होती. यादरम्यान कोर्टातील गर्दी पाहून पंतप्रधान मोदींना, असं आवाहन करण्यात आलं आहे.


देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. अशातच ओमायक्रॉनबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशातच येत्या काळात उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली असून त्यादृष्टीनं तयारीही सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह स्वतः उत्तर प्रदेशचे दौरे करत आहेत. तसेच अनेक विकास कामांना गतीही देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. त्यासोबतच सरकारनं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.


उच्च न्यायालयानं म्हटलंय की, "राज्यातील निवडणूक रॅली आणि सभा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयुक्तांनी कठोर पावलं उचलावीत. राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमानं प्रचार करावा, असं सांगावं. पंतप्रधानांनीही निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करावा, कारण 'जान है, तो जहान है'." 


दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयानं पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलं आहे. देशभरात सुरु असलेल्या राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेबाबत न्यायालयानं मोदींचं कौतुक केलं आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात मोफत लसीकरण अभियान चालवले, हे कौतुकास्पद आहे, असं म्हणत न्यायालयानं मोदींचं कौतुक केलं आहे. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा