नाशिक : नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. एकनाथ शिंदेंना व्हीआयपी एंट्री न दिल्याने मारहाण केल्याची माहिती आहे.


काल रात्री उशिरा शिंदे नाशिकहून ठाण्याकडे परतत असताना ही घटना घडली. संदीप घोंगडे या टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. घोंगडे यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे नाशिकहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीला व्हीआयपी लेनमधून सोडण्यास टोम कर्मचाऱ्यांनी नकार दिला. व्हीआयपी लेन बंद असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आणि संदीप घोंगडे यांना बेदम मारहाण करण्यात आली.

बॉडीगार्डने काच फोडली : संदीप घोंगडे

''बंदूकधारी बॉडीगार्डने काचेवर काहीतरी जोरात मारलं. काचा माझ्या तोंडावर उडून मी रक्तबंबाळ झालो. मंत्री महोदयांचा ताफा येतोय याची काही माहिती देण्यात आली नव्हती. सरकारी रुग्णालयने फार काही उपचार केले नव्हते. शेवटी खाजगी रुग्णालयात दाखल झालो. 6 टाके पडले आहेत,''  असं संदीप घोंगडे यांनी 'माझा'शी बोलताना सांगितलं.


 

एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

''टोलनाक्यावर बॉडीगार्डने टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळला आहे. काच फुटल्याने संबंधित कर्मचारी जखमी झाला. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यास बॉडीगार्डवर कारवाई करण्यात येईल,'' असं एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.



काच फुटून कर्मचारी जखमी, मारहाण झालीच नाही : एकनाथ शिंदे