मुंबई : आम्ही दिल्लीला जातो ते मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे तर राज्यात प्रकल्प आणण्यासाठी जातो. जर राज्यात सत्तांतर केलं नसतं तर राज्य मागे गेलं असतं, सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. 


एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे


1. तुम्ही शिवसेनेचा भगवा बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला


तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला. अशा लोकांसोबत बाळासाहेब कधीही राहिले नसते.बाळासाहेबांची सगळी स्वप्नं कुणी पूर्ण केली तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. ठाकरे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार. मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते, पण हे स्वतःच मुख्यमंत्रिपदी बसले. मोदींनी ते केलं आणि मला मुख्यमंत्री बनवलं. 


2. जिथे टेंडर, तिथे सरेंडर हे ठाकरेंचे धोरण


जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी होती. धारावी मुंबईचा विकास होईल हे सगळं मी पाहतोय. धारावी इथे देखील प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धाराविकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही 2 लाख 10 जणांना घरे देणार, पात्र अपात्र बघणार नाही. 2 लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण आम्ही करणार. 


3. घासून पुसून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली


सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.


4. हिऱ्याच्या पोटील गारगोटी जन्माला आली


शिवसेना बाळासाहेब ठाकरेरुपी हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, सहा महिन्यात पडेल अशी टीका केली जायची. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून पुसून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा चेला, आनंद दिघेंचा शिष्य आहे.मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे.


5. उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकाचा अपमान झाला असता


गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडकं सरकार झालंय. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता.


6. मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत जात नाही, प्रकल्प आणण्यासाठी जातो


आम्ही दिल्लीला जातो प्रकल्प आणण्यासाठी, मला मुख्यमंत्री करा सांगायला जात नाही. पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यादिवशी आशाताई यांनी देखील आमच्या सरकारचे कौतुक केलं. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे. 


7. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं 


या सरकारने आधीच्या दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती, मराठा समाजाला आरक्षण देणार. आम्ही ताबडतोब आरक्षण दिलं. पण कोर्टात कोण गेले? तरीही कोर्टाने मराठा आरक्षण अजून कायम ठेवले आहे. 


8. तर लाडक्या बहिणीला 3 हजार कोटी दिले असते


तुमच्या तोंडाला लागलेले शेण असे लपणार नाही. आम्ही रस्त्यावर फिरत होतो, रुग्णांना मदत करत होतो. तुम्ही घरात बसून कोविड टेस्ट करत होता. कोणी भेटायला आलं त्याला बाहेर काढलं. हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही. तुम्ही काय काम केलं ते चार चौघात सांगू शकणार नाही. योग्य वेळ येईल तेव्हा नक्की सांगू.  यांच्या अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 17 हजार कोटींचे कर्ज वाढलं. ते वाचलं असतं तर आज मी लाडक्या बहिणीला 3 हजार दिले असते. 


9. ही जनता महायुतीला मोठं करणार


आता निवडणूक येणार असून राज्यातील जनता महायुतीला मोठं करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, माझ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँड ॲम्बेसेडर झाल्या आहेत. लाडके भाऊ ब्रँड ॲम्बेसेडर झालेत. 


10. विधानसभेचा विजय भव्य-दिव्य असला पाहिजे


लोकसभेत तिकडे एक गठ्ठा मतदान झाले. पण आपण सुट्टी बघून फिरायला गेलो. हे पुन्हा होईल का? आता मतदार यादी तपासायला हवी. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोचवा. तुम्हाला मान खाली घालयला आम्ही सांगितले नाही, ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आज दसरा आहे, असत्याचा रावण आपल्याला गाडून टाकायचा आहे. विधानसभेचा विजय भव्य दिव्य असला पाहिजे. निर्धार करा विरोधकांना चारही मुंड्या चीत करण्याचा. राज्यात आज जे वातावरण आहे ते समृद्ध आहे. हे आपण केलं ते येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. 


ही बातमी वाचा: