नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला.


विरोधी पक्षात आपण सातत्याने मागण्या करायचो, मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा निशाणा खडसेंनी सरकारवर साधला.

खडसेंनी पंकजा मुंडेंना झापलं

खडसे यांनी आपल्याच सरकारला विधानसभेत चांगलंच अडचणीत आणलं.

राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक काम करतात, त्यांना किमान वेतनही दिलं जातं. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी आज विधानससभेत सरकारला विचारला.

खडसे यांच्या प्रश्नावर रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा प्रश्न मनरेगाशी संबधित असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यावर आपण निर्णय घेऊ शकत नाही.

पंकजा मुंडे यांच्या या उत्तराने खडसेंनी पंकजा मुंडे यांनाच झापलं.

पंकजा मुंडे यांच्या उत्तराला हरकत घेत, “मी प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबाबत आणि ही योजना राज्य सरकार चालवतं”, असं खडसे म्हणाले.

त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयाची माहिती घेऊन,ती सभागृहाला दिली जाईल असे आश्वासन देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वीच्या सरकारने रोजगार हमी योजनेवरील कामगारांना असंघटीत कामगारांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी मी विरोधी पक्षनेता म्हणून, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून सातत्याने प्रश्न उपस्थित करत होतो. पूर्वी विरोधात होतो. त्यामुळे सातत्याने प्रश्न विचारायचो आता सत्तेत आलोय तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आपली जबाबदारी आहे, अशी आठवण खडसे यांनी राज्य सरकारला करून दिली.

संबंधित बातम्या

संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो : खडसे

भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

माझी अवस्था अडवाणींसारखी, एकनाथ खडसेंची मार्मिक टिपणी

खडसे, चव्हाणांनी नियम दाखवला, सरकारची अडचण

खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!